Monday, January 3, 2011

मी गर्दीत वाट हुडकतोय .................

रोज सकाळ होते , मी जागा होतो , पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो . उठून शाळेत जायचो , गर्दीत सामील व्हायचो , बे एके बे पासून १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो , लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो , आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो . शाळा झाली , सगळे ११ वी / १२ वी करतात म्हणून मी ही केली , सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो .




शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो . ........................



१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो . अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो , मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो . अरे तो यूएस ला गेला , हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो . सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो .



शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो ............................



लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो . माझेही इंडक्षन झाले , काम झाले , कष्ट झाले , अप्रेज़ल झाले , मॅनेजर ला शिव्या देणे झाले , ३ / ४ स्विच झले , पॅकेज वाढले . मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालो . मी पुर्वी पंकज द्वारकानाथ मोहोटकर मधला " पन्या / पंक्या " होतो आता " पी . एम ." झालो आहे . आता सगळ्या गोष्टी पैश्यात मोजू लागलो आहे . एक दिवस लक्ष्यात आले की मी गर्दीत आहे खरा , पण मला कोणी जवळचा नाही , वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर ३ / ४ तास गप्पा मारणारा मित्र नाही . मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो , वीकेंड ला फालतू गप्पा आणि लंच / डिनरसाठी तडफडतो .

घरात पण मी नसतो कारण रोज १२ / १३ तास गर्दीत असतो , २ दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मला “ जाउ दे त्याला निवांत ” महणून सोडून देतात . असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो . आज काल मी टिपिकल सॉफ्टवेरवाला झालो आहे , माझी कंपनी , माझे पॅकेज , माझे डेसिग्नेशन , माझा वेरियबल , माझा बुक केलेला फ्लॅट , त्याचे प्रोग्रेस मधील फोटो , माझी यूके वारी त्याचे तेच ते पकाव पीकासा वरचे आल्बम , माझी कार ……….. सगळ्याना दाखवत बसतो …. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो , …....



मला ढीग भरून स्क्रॅप येतात , ऑरकूट / फेसबुक वर शेकडो फ्रेंड्स भेटतात , सगळे स्क्रॅप शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्स राहतात . त्यातलाच कोणी काय भावा कुठे असतोस ये की चा मारू हे बोलत नाही , आणि आज काल आई-आप्पा कुठं तुझ्याकड की गावाकड असले प्रश्न पण विचारत नाही . कोणी फोन करून लेका गावाकड ये कि एकदा , किंवा यंदा तरी जत्रेला ये कि भावा असे पण म्हणत नाही , मला कोणीच ऑरकूट वरचा ये की मर्दा घराकड एकदा जेवाय असे पण म्हणत नाही , आम्ही ढीग आउटिंग / पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही . गावाकडे आहेत काही मित्र , पण मी तिकडे जात नाही , आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे , ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या इंवीटेशन मध्ये जाणवत नाही . लोकही माझे मेल / स्क्रॅप / पीकासा आल्बम पाहतात आणि ते पण ; “ च्यायला हा ऑनसाइट जाऊन आला वाटते ” असे म्हणत फोटो न बघता लॉग ऑफ मारतात , त्याना फार आवड नसते बघायची , एखादा कॉमेंट टाकून बस गर्दीचा नियम पाळत असतात .



गर्दीत राहून पण मी आज एकटा आहे ……… नावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत , आयुष्यात एक वेळी अशी येते की ही गर्दी कामात येत नाही , कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील , पण दुखा : च्या वेळची ग्यारेंटी नाही . पण तुम्ही सुधा दु : खी व्हाल , त्या वेळेला कलीग , डिलीवरेबल्स , मीटिंग्समधे व्यस्त असतील आणि वीकेंड ऑलरेडी प्लान झाला रे .... सॉरी ... असे म्हणत कलटी टाकतील . सॉफ्टवेर वाला झाला म्हणून काय ? दु : ख कधी तरी येतेच त्याला तुम्ही इंस्टालमेंट अमाउंट देऊन टाळू शकत नाही . प्रत्येक अडचण पैश्याने सोडवता येत नहीं . अश्या वेळी लागतात ते फक्त मित्रच , जे बिचारे कधी कलीग नसतात अणि ते कुठल्याच गोष्टी पैश्यात मोजत नसतात .



मी विचार करतो की मी या गर्दीत का चालत राहिलो ? सगळे करतात तेच बरोबर असेल , जे काय व्हायचे ते सगळयांचे होईल , या गर्दीच्या फुटकळ तत्वावर विश्वास ठेवत राहिलो . काय असते ही गर्दी ? इयत्ता १ ली ते ….. इंटरव्यू राउंड पर्यंत काय करते ही गर्दी ? कोण ठरवतो यांची दिशा ? या गर्दीत कोणच कुणाला ओळखत नाही ...... पुढचा चालतो म्हणून मागचे चालतात . .. आणि मागे खूप लोक आहेत म्हणून पुढचा चालत राहतो . आपण जगत नाही आहोत आपण आपल्याला जगवत आहोत , कशासाठी ते कुणालाच माहीत नाही , मी माझे वैयक्तिक आयुष्य विसरत चाललो आहे का ? मला पक्के मित्र मिळत नाहीत का ? का मीच त्या वाटेला जात नाही . विचार करून डोके दुखु लागले , उपाय म्हणून कायतर मशीन ची हॉट कॉफी मारुन पार्किंग मधे कलीगला घेऊन चक्कर मारुन आलो . पण आता ठरवले आहे …… काही तरी केले पाहिजे , जुन्या आयुष्यात परत गेले पाहिजे , का मी जाउ शकत नाही ? माझे डेसिग्नेशन मला आडवे येते का ? कोण मला अडवणार ? का नाही मी सुखी एवढे पैसे मिळवून , का नाही मला कोण अगदी जवळचा इतके सगळे कलीग असून ? बरेच काही हरवलय ........ बरेच काही गमावलय ............. नक्की कुठे वाट चुकली हे पण कळत नाहीए ........ गर्दी कुठे तरी जाते म्हणून मी माझे स्वत : चे असे सगळे सोडून गर्दीतला दर्दि झालो .......... गर्दी करते ते सगळे नियम पाळायला लागलोय .



कधी तरी या कळपातून वेगळा रस्ता काढून बाहेर जायचे आहे . बसस्स ....... आता ... ठरवले आहे … आणि सुरुवातही केलेली आहे , कलीग म्हणतात हा आज काल वीकेंड ला येत नाही बरोबर , हा थोडा वेगळाच वाटतो आहे , लास्ट वीक म्हणे तेच्या गावी गेला होता तिथे सुट्टी टाकून त्या लोकांबरोबर राहिला . आज काल म्हणे पुन्हा आळंदीला ज्ञानेश्वरांच्या मंदिरात जातो , ए हा असा का करतो ? या वेळी वारीला सासवडपर्यंत पायी गेला होता म्हणे , अजुन काय तर या वेळी म्हणे पुन्हा " घुमाई देवी " च्या यात्रेला गावी जाणार आहे , हे हा खरेच असे करणार आहे ? मी थोडा वेगळा झालो आहे , गर्दीत आत्ता थोडी कुर्बुर आहे , अगदी मान खाली घालूनच चालत आहे .......... लोक वाट चुकलेला का म्हणेना मला …… पण मी मान खाली घालून माझी वाट शोधत आहे . एकदा विचार करा मित्रांनो या सगळ्या गडबडीत आउटकम काय ?? समाजात फक्त आपण आपल्या नावावर काही “ स्क्वेरफूट ” घेण्यासाठी धडपडत आहोत काय ?? का उगाच फ्रेंड्स ग्रुप वरचे फ्रेंड्स काउंट दाखवून स्वत : चे समाधान करत आहोत काय ?



आपलाच ... गर्दीत हरवलेला एक मित्र ,

Tuesday, June 8, 2010

FW: Fw: Fw: सागरा प्राण तळमळला न

 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी, लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक आणि हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार आणि जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

 

त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते आचार्य प्रह्लाद केशव अत्रे यांनी दिली. आज  स्वातंत्र्यवीरांची जयंती म्हणून त्यांच्या गाजलेल्या आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या "सागरा, प्राण तळमळला" कवितेच रसग्रहण 

 

सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विराहशंकीताही झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ...

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनी का आंग्ल भूमी ते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...

रसग्रहण 

त्या सागरावर रागावलेला - रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो - 'सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.
भूमातेच्या चरणतला तुज धूता ।
मी नित्य पाहिला होत

त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास - मित्र मित्राला म्हणतो तसा - की चल जरा फिरायला जाऊ
दुस-या देशात-
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ ।
सृष्टीची विविधता पाहू

त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.
तअ जननी-ह्रद विरहशंकितहि झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले

पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन - जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी

तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी 'बनलो' तयार झालो आणि 'बनलो' म्हणजे फसलो.
तव अधिक शक्त उदधरणी । मी

पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण (buoyancy) म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि 'उद् धार करणे' याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी - तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं !
'येईन त्वरे' कथुन सोडिले तिजला ।
सागरा प्राण तळमळला ।।१।।

लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ।
ही फसगत झाली तैशी

पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.
भू विरह कसा सतत साहू या पुढती ।
दशदिशा तमोमय होती

तमोमय म्हणजे अंधःकारमय - मार्ग दिसत नाही असं झालंय.
गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा

मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता - प्रेम इथे नाही.
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा

राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.
भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे

हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती - इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत -माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर - मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।

यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात-
या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ?

माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी

विजनवास विदेशवास किंवा विवास - तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक -
तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे

माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.
कथिल हे अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळल

आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.

मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय. युवा केंद्राचं आगळेपण हे आहे की सागरावरचं हे तुफानी काव्य गात आहे सागरच !
विशेष आभार-www.savarkar.org

Rajshekhar Karlekar